Deepak Phatak
परम मित्र डॉक्टर श्री. नानासाहेब बेंद्रे ह्यांना आदरांजली
नानासाहेब गेले हे कळल्यावर मन क्षणभर निशब्द दुःखाच्या आणि अनंत स्मृतींच्या विवरात जणू घरंगळत जाऊन पडले. त्यांची तब्येत मधुमेहाच्या विकाराने बिघडली आहे हे कळत होते, पण ती इतक्या अवस्थेपर्यंत आली आहे ह्याची कल्पना नव्हती. त्यांच्या आकस्मिक निधनाने आमच्या समस्त मित्रपरिवारातील एक आधारस्तंभ निखळला आहे. पाच वर्षांपूर्वी ऑगस्ट मध्ये माझी प्रिय पत्नी सौ. स्वप्ना अचानकपणे गेल्यावर मला लगेच फ्लोरिडा तून सांत्वन करायला नानासाहेब आले होते, तेव्हा त्यांनी "अहो, दीपक तुम्ही तर गीतेतील सांख्य तत्वज्ञान जाणता , "वासांसि जीर्णानी यथा विहाय नावानी गृहन्नाती नरोपराणी " इत्यादी, तेव्हा तुम्हाला शोक आवरून धैर्याने ह्यातून बाहेर आले पाहिजे. हे सर्व त्यांनी अतिशय प्रेमापोटीच्या आपुलकीने सांगितले, त्याने खूप धीर आला. माझी खात्री आहे की त्यांना त्यांच्या बळावत चाललेल्या दीर्घकालीन दुखण्यामुळे कविवर्य मोरोपंतांनी वर्णिल्या प्रमाणे "कृतान्तकटका S मल -ध्वज जरा दिसो लागली; पुरः सर- गदांसवे झगडतां तनू भागली " अशी नानासाहेबांच्या मनाची स्थिती झाली असावी, आणि ह्या उक्ती नुसार त्यांच्या दिशेने येणाऱ्या काळाची पावले त्यांना दिसत असावीत. त्यामुळे त्यांनी स्थितप्रज्ञासारखा काळाचा स्वीकार केला असावा. असो, हे सर्व तत्त्वज्ञान नानासाहेबांसारख्या नावाप्रमाणेच देवदत्त प्रगाढ बुद्धीवैभव असलेल्या व्यक्तिमत्वाला शक्य असेल, पण माझ्या सारख्या साधारण विचारांच्या व्यक्तीला एकदम आपण पोरके झालो असे वाटल्यास त्यात गैर काय आहे ?
नानासाहेबांच्या गेले ४० वर्षाहून अधिक काळाच्या सहवासातील अगणीत स्मृतींचा कोलाहल मनात दाटला आहे. तो काळाच्या व्यवधानामुळे फक्त थोड्याच वाक्यात व्यक्त करणे केवळ अश्यक्य आहे. एक अतिशय विख्यात, प्रथितयश , निष्णात प्लास्टिक सर्जन, FRCS , MRCP इत्यादि वैद्यकीय क्षेत्रातील विश्वमान्य बिरुदावली त्यांच्या नावामागे आहेत हे सर्वश्रुत आहेच. पण ह्या सर्व ज्ञान संपदेच्या आत असलेली अतिशय प्रेमळ, नर्म विनोदाची झालर लावून , निखळ आनंद देत राहणारी व्यक्ती अशी त्यांची ओळख माझ्या सारख्या यांत्रिक विज्ञान (Mechanical Engineering ) क्षेत्रातल्या मित्रांना आहे. मी तर त्यांना एकदा निसंकोचपणे "काहो, नानासाहेब , प्लॅटिक सर्जेरी साठी कोणचे प्लास्टिक वापरता हो ?, असा भाबडा प्रश्न ४० वर्षांपूर्वी विचारला होता." त्यावर, खळखळून हसत, "अहो, दीपक, त्याच असा आहे " अशी प्रस्तावना करून सविस्तर साद्यन्त माहिती दिली. ती देतांना त्यांनी “मी (दीपक) किती अज्ञानी आहे” हे मुळीच भासवले नाही.
अमेरिकेतील मराठी समाजातील सर्व घडामोडीत त्यांचा अग्रभागी, सिंव्हाचा वाटा होता, जसे, BMM (बृहन महाराष्ट्र मंडळ) चे फौंडेर मेंबर, न्यू जर्सी तील मराठी विश्व चे निर्माण प्रमुख इत्यादी.
तर, मित्रांनो, नानासाहेब आपल्यात दुर्दैवाने आता नाहीत ही वस्तुस्थिती मानायला मन तयार नाही . पण अश्या अनंत, असंख्य आठवणींचा ठेवा सदैव आमच्या सर्वांच्या मनात रुंजी घालत राहणार, ह्यात शंका नाही.
श्रीमती सुमित्रा वाहिनी, आणि मेधा, राजू ह्यांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. तुम्ही सर्व जण, आपली काळजी घ्या, आणि आपण सर्व नानासाहेबांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे स्मरण, अनुकरण करूया. त्यांच्या प्रेमळ, निर्मळ आत्म्याला शांती लाभो ही ईश चरणी प्रार्थना !
आपला ,
दीपक फाटक